गडचिरोलीत शिक्षणाचा 'फुलोरा' बहरला ! ;मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांची संकल्पना
गडचिरोली : नक्षलवादग्रस्त अतिदुर्गम गडचिरोली या आदिवासी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रेरणेतून फुलोरा क्षमता विकसन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
या प्रकल्पाचे केंद्र तथा राज्य पातळीवर सर्वत्र कौतुक होत आहे. ६९७ शाळांमध्ये हा प्रकल्प सुरू असून जूनअखेर एक हजार शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुलांना हसत खेळत या माध्यमातून शिक्षण मिळत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी पूर्वप्राथमिक शिक्षण पूर्ण न करता जिल्हा परिषद शाळांमध्ये दाखल होत असतात. यातील बहुतांश मुले ही आपल्या बोली भाषेचाच वापर करतात. या मुलांची बोलीभाषा न नाकारता त्यांना प्रमाणभाषेकडे नेण्याच्या दृष्टीने वेगवेगळय़ा कृती केल्या जात आहेत. यासाठी जिल्हा परिषद शाळेतील मुलांना प्राथमिक शिक्षणाबरोबरच बालशिक्षणही दिले जात आहे. या शैक्षणिक प्रवासात स्थूलकारक विकास, सूक्ष्मकारक विकास, सामाजिक भावनिक विकास, बोधात्मक विकास, बोली भाषेचा विकास, साक्षरतेचा विकास, सर्जनशीलतेचा विकास व गणिती विकास हे टप्पे महत्त्वाचे आहेत. यामधून मुलांच्या स्नायूंवर नियंत्रण, हालचालीत सुसूत्रता, भावनांवर नियंत्रण, जग समजून घेण्याची धडपड, वेगवेगळय़ा भाषा आत्मसात करणे आवश्यक असते. गडचिरोली जिल्ह्यात हा उपक्रम २०२०-२०२१ पासून पहिल्या टप्प्यात एकूण ३३६ शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण ३४३ शाळांची निवड करण्यात आली. सध्या एकूण ६९७ शाळांमध्ये हा प्रकल्प सुरू आहे. या शाळांची संख्या जून २०२२ अखेपर्यंत १००० केल्या जाणार असून पुढील शैक्षणिक सत्र पूर्ण होण्यापूर्वी शंभर टक्के शाळांमध्ये उपक्रम राबविण्याचा मानस आहे. या उपक्रमाचे नियंत्रण करण्यासाठी प्रति तालुका शिक्षकांची तालुका समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे. करोनाकाळात ग्रामीण भागातील विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून, प्रात्यक्षिक शिक्षणापासून वंचित राहिले होते. तसेच करोनामुळे विद्यार्थ्यांना पोषक शैक्षणिक वातावरण मिळालेले नाही.
करोनाकाळात झालेले नुकसान भरून काढण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत आहे. पंतप्रधानांच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी हा उपक्रम प्रस्तावित असल्याने दिल्ली येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चमूने दिभना, घोडेझरी, साखरा या शाळांना भेटी दिल्या. या तपासणीमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्तर उंचावल्याचे निदर्शनास आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत: तीन शाळांची निवड केली व अतिदुर्गम क्षेत्रात असलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत झालेला बदल पाहून समाधान व्यक्त केले.
वैशिष्टय़पूर्ण उपक्रम
फुलोरा उपक्रमामुळे गुणवत्तेत झालेली वाढ लक्षात घेऊन केंद्र शासनाने फुलोराला पुरस्काराकरिता प्रस्तावित केले आहे. या पुरस्काराकरिता केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागाकडून ३४०८ अर्ज प्राप्त झाले. यामध्ये महाराष्ट्रातून फुलोरा हा एकमेव उपक्रम आहे.
विभागीय आयुक्तांकडून कौतुक
विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी गोगांव येथील फुलोरा क्षमता विकसन बालभवन प्रकल्प असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला भेट दिली. या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानासह विविध नावीन्यपूर्ण स्थानिक साहित्यामधून मुलांना शिक्षण दिले जाते, त्याची माहिती त्यांनी जाणून घेतली. यावेळी आयुक्तांनी तेथील शिक्षण पद्धतीचे कौतुक केले व उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले.
या उपक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. या भागातील विद्यार्थी करोनाकाळात ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहिले. त्यांना या प्रकल्पाचा लाभ झाला आहे. येत्या काळात एक हजार शाळांमधून हा प्रकल्प राबविण्यात येईल.
- कुमार आशीर्वाद , मुख्य कार्यकारी अधिकारी , गडचिरोली.
Comments
Post a Comment