आता सरकारी कामकाजासाठी ई-मेल, व्हॉट्सॲप वापरता येणार
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
पुणे : सरकारी कार्यालयांमध्ये कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढू नये यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आवश्यकतेनुसार घरातच राहून सरकारी कामकाजासाठी ई-मेल तसेच व्हाट्सॲपचा वापर करावा, तो ग्राह्य धरण्यात येईल अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.
लॉकडाऊनच्या कालावधीत राज्य सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती नियंत्रित करण्यात येत आहे.
भविष्यातही अशा प्रकारची परिस्थिती लक्षात घेता सरकारी अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांच्या घरातच राहूनही कार्यालयीन आवश्यकतेनुसार कामकाजाचा निपटारा करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
यासाठी त्यांच्या ई-मेल तसेच व्हाट्सॲपचा वापर सरकारी कामकाजासाठी तसेच संबंधितांना सूचना देण्यासाठी करणे ग्राह्य धरण्यात येईल. प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांचे सरकारी ई-मेल आयडी आणि त्यांच्या ई-मेल आयडी, एस.एम.एस. व्हाट्सॲपची सुविधा असलेला मोबाईल क्रमांक त्यांच्या कार्यालय प्रमुखांस उपलब्ध करून द्यावा.
ई-मेलद्वारे प्रस्ताव फॉरवर्ड केल्यानंतर त्याची सूचना लगेचच संबंधितांस एस.एम.एस किंवा व्हाट्सॲपवरून देण्याबाबत दक्षता घ्यावी. वरिष्ठांकडून प्राप्त सूचनेनुसार ईमेलद्वारे अंतिम मान्यतेसाठी सादर केलेला प्रस्ताव हा दोन्ही स्तरामधील अधिकाऱ्यांनी तपासून मान्य केला आहे, असे गृहित धरण्यात येईल.

Comments