भयंकर! नाकाबंदी चौकीवर कर्तव्यावर असलेल्या शिक्षकाला सिमेंटच्या ट्रकनं चिरडले
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
source:- लोकसत्ता
करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं घेतलेल्या लॉकडाउनच्या निर्णयाची राज्यांकडून काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य आणि जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्या असून, मालवाहतूक सुरू आहे. या वाहनांची तपासणी करण्याचं काम पोलिसांकडून केलं जातं आहे. दरम्यान, सांगली जिल्ह्यातील डफळापूर येथे नाकाबंदी चौकीवर पोलिसांसोबत कर्तव्यावर असलेल्या शिक्षकाला भरधाव ट्रकनं चिरडल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

सांगली जिल्ह्यातील डफळापूर येथे नाकाबंदी चौकी तयार करण्यात आली आहे. या ठिकाणी वाहनांची तपासणी करण्याचं पोलिसांकडून केलं जात असून, मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून नागरिक धोकादायक पद्धतीनं प्रवास करणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.
दरम्यान, या पोलिसांना साहाय्य होण्यासाठी राज्य शासनानं शाळेतील शिक्षकांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. डफळापूर शाळेत कार्यरत असलेले शिक्षक नाना कोरे हे नाकाबंदी चौकीवर होते. कर्तव्यावर असताना कर्नाटकातून सिमेंट घेऊन एक ट्रक येत होता. पोलिसांनी हा ट्रक शिंगणापूर नाक्यावर थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकानं ट्रक थांबवला नाही.

त्यानंतर पोलिसांनी ट्रकचा पाठलाग सुरू केला. यात झटापटीत जत तालुक्यातील डफळापूर नाकाबंदी ठिकाणी ट्रक चालकानं शिक्षकालाचं जिवंत चिरडलं. यात शिक्षक नाना कोरे जागीच ठार झाले. घटनेनंतर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं.

लॉकडाउनच्या काळात राज्याच्या सीमांबरोबर जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. प्रवासी वाहतूकीतून करोनाच्या प्रसाराची भीती असल्यानं राज्य सरकारनं हा निर्णय घेतला होता. त्यामुळे आतंरजिल्हा प्रवास सध्या बंद आहे. मात्र, अनेक ठिकाणी अडकलेले लोक मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या मदतीनं घरी जात आहेत. धोकादायक पद्धतीनं नागरिकांनी प्रवास करून नये म्हणून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून, वाहनांची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे

Comments